युवा सिद्ध शिव साधना शिबीर

( स्वयं सेवक निर्माण हेतू )

युवा शक्ती ही प्रत्येक युगामध्ये देशाची विराट शक्ती मानली जाते. युवा शक्ती ला अध्यात्मभिमुख केल्याशिवाय जीवनाची पायाभूत उभारणी होऊ शकत नाही. केवळ भौतिक सुखसुविधांनी, जीवन आधुनिकतेच्या उंच शिखरावर नेऊन नावलौकिक कमवून उपभोग घेणे हेच उदिष्ट आजच्या तरुणांचे होऊन बसले आहे. श्रद्धास्थानाच्या अभावी भौतिक सुखाच्या मागे लागून व्यसनाधीन झालेली पिढी परिवाराला व समाजाला उत्थानाच्या दिशेने नेऊ शकत नाही. हे चित्र समोर ठेऊन युवाशक्ती ला त्यांच्या कर्तव्य प्रति जगवून जीवन कल्याणाचा मार्ग दाखविण्यासाठी विशेषतः युवा शक्तीसाठी साधना शिबिराचे आयोजन केले जाते. ज्यामध्ये जीवनाचे उद्दिष्ट डोळयांसमोर ठेऊन संयम्, नियम धारण करण्याचा बोध प्राप्त होतो. ध्यान धारणा, योगासने, प्राणायाम व साधनेद्वारे योग्य दिशा प्राप्त होऊन तरुण वर्ग चैतन्य शक्तीत परिपूर्ण करणे यांसाठी साधना शिबीराचे आयोजन अशदमाद्वारे केले जाते.

ध्यान साधना शिबीर

संपूर्ण जगताला धारण करणारी चैतन्यशक्ती आत्म्याच्या रूपाने सर्व जीवांच्या अंतर्यामी वास करते.

मनुष्य देह प्राप्त झाल्यावर आत्म्याच्या प्रति श्रद्धा जागवून आत्मप्राप्तीसाठी प्रयत्न करणे मनुष्य जन्माचे आद्य कर्तव्य आहे. शरीर व मन शुद्ध केल्याशिवाय आत्मा प्रकट होत नाही. यासाठी काया व मन शुद्ध करून साधना प्रारंभ करणे जीवाचे परम कर्तव्य आहे.

सिद्ध साधना शिबिराद्वारे शुद्ध काया, आचार, विचारांच्या प्राप्तीसाठी शास्त्रानुभूत अभ्यासक्रम परम पूज्य दिदीजींनी निश्चित केला आहे.

प्रथम चरण – कायाशुद्धी, द्वितीय चरण – मन:शुद्धी व अंतिम चरण – आत्मनुभूती, अनुक्रमे या क्रमाने सहजरित्या अत्म्यापर्यंत पोहचणे हे ध्येय लक्षात घेऊन साधकांना आहार, विहाराची शुद्धता, मौन व काही सुलभ नियम देऊन जीवन पवित्रतेचा मार्ग प्राप्त होतो.

Call Now Button